(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीगोंदा – काष्टी ग्रामपंचायतीच्या दप्तरी जमीन खरेदीखत व संमतीपत्राची नोंद करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी शरद साहेबराव कवडे (वय ५३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदाराच्या वडिलांनी काष्टी येथील सिटी सर्व्हे क्रमांक १८१ मधील ४०.३५ चौ.मी. बांधकाम व बखळ जागा खरेदी केली होती. या खरेदीखताची श्रीगोंदा दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक ३५९८/२०२६ अशी नोंद झाली होती. तसेच काष्टी ग्रामपंचायतीच्या मालकीची १२ बाय १२ फूट म्हणजेच १४४ चौ.फूट जागा भाडेतत्त्वावर वहिवाटीस देण्यात आली होती.
या संबंधित कागदपत्रांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी कवडे यांनी तक्रारदाराकडे १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
१४ ऑक्टोबर २०२६ रोजी हॉटेल स्वाद, कोळगाव येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी संबंधित दस्तऐवज व संमतीपत्राची नोंद करण्यासाठी कवडे यांनी १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नमूद केले आहे.
या प्रकरणी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.०८ वाजता बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४११/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले. त्यांना पोलीस हवालदार शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल निमसे, कराड व चालक पोलीस हवालदार हारुन शेख यांनी सहकार्य केले.या कारवाईस नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.