(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी-शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने पायरेन्स आयबीएमए, लोणी येथील विद्यार्थ्यांनी रतनवाडी येथील ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून मंदिर परिसर स्वच्छ करून ऐतिहासिक वारशाच्या जतनाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला.
पायरेन्स संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे सचिव व संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयबीएमएचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अमृतेश्वर मंदिर प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरातील प्लास्टिक, कागद, खाद्यपदार्थांची वेष्टने आणि इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. तसेच पर्यटक आणि भाविकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करावे, असे आवाहन केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संघभावना, नियोजन, नेतृत्व आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. पर्यटनस्थळांचे सौंदर्य टिकविण्यासाठी नागरिकांनीही स्वयंप्रेरणेने पुढाकार घेण्याची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.स्वच्छ परिसर, समृद्ध वारसा आणि संवेदनशील समाज हा संदेश देणारी ही मोहीम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, पर्यावरणप्रेम आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणारी ठरली.