Uncategorized

ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे मराठी एकजूट? हा मोठा गैरसमज आहे; मराठी भाषेला राजकीय ढाल बनवू नका – गंगाधर चौधरी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे राज्यातील सर्व मराठी भाषिक एकत्र येतील हा सर्वात मोठा गैरसमज आहे.ठाकरे बंधूंनी स्वतःच्या फायद्यासाठी मराठी भाषेला ढाल बनवले आहे; त्यांना मराठी भाषेला राजकीय केंद्रस्थानी ठेवून निव्वळ राजकारण करायचे असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

 

 

गंगाधर चौधरी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, संपूर्ण भारत देशात अनेक भाषा आहेत आणि त्या सर्व भाषांचा आदर केला गेला पाहिजे.आम्हालाही मराठी भाषेचा प्रचंड अभिमान आहे.मात्र, त्याच वेळी आम्ही इतर भाषांचाही तितकाच सन्मान करतो. परंतु परप्रांतीय नागरिकांना मराठी येत नाही म्हणून त्यांच्या विरोधात दादागिरी करणे अयोग्य आहे.ठाकरे बंधू एकत्र आल्यावर इतक्या उद्धटपणाने वागत आहेत, तर सत्ता आल्यावर कसे वागतील? ज्यावेळी मराठी भाषा बोलण्यावरून वाद होतात तेव्हा अनेक मराठी भाषिक तरुणांवर गुन्हे दाखल होतात तेव्हा ठाकरे बंधू कोठे जातात त्यांना कोणीही वाचवायला येत नाही कारण त्यावेळी त्यांनी राजकारणी संधी साधलेली असते असा प्रश्न त्यांनी बोलताना उपस्थित केला आहे

 

 

चौधरी यांनी पुढे सांगितले की, इतर भाषिकांना कमी लेखणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरिक परराज्यात स्थायिक झालेले आहेत. उद्या त्या राज्यांतील नागरिकांनी मराठी भाषिकांवर अशाच प्रकारे अन्याय केला तर ते चालेल का? कोणतीही अघटित घटना केव्हा कोणासोबत घडेल सांगता येत नाही.जरी हे नागरिक महाराष्ट्रातले मूळ रहिवासी नसले, तरी त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे. ठाकरे बंधूंनी भारताची नागरिक प्रतिज्ञा पुन्हा एकदा वाचावी “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” पण आज तेच विसरल्याचे चित्र आहे. गलिच्छ राजकारणासाठी त्यांनी या ओळींकडे पाठ फिरवली असून मराठी भाषेला ढाल बनवत ते वैयक्तिक राजकीय फायदा मिळवू पाहत आहेत.परंतु यात महाराष्ट्र राज्याची बदनामी होत आहे हे ही लक्षात घेणं तितकंच महत्वाच आहे.

 

आज सर्व जाती, धर्म, भाषांचे लोक या देशाचे नागरिक आहेत.भारत घडवण्यासाठी प्रत्येक समाजाने आपापल्या परीने मोठे योगदान दिले आहे. अशा परिस्थितीत, केवळ एकत्र आले म्हणून हिंदी भाषिकांना दादागिरीने मारहाण करणे, हा उद्धटपणा आहे.२० वर्षांनंतर एकत्र आल्यावर जर इतकी अरेरावी दिसत असेल, तर सत्ता आल्यावर हे लोक मराठी जनतेलाही मारहाण करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, अशी भीतीही चौधरी यांनी व्यक्त केली. कारण त्यांना देशभक्तीपेक्षा निव्वळ सत्ताकारणच अधिक महत्त्वाचं वाटत आहे.

 

 

आज देशासाठी परप्रांतीय नागरिकही निष्ठेने सेवा करत आहेत. उद्या जर ठाकरे बंधूंनी गुजरातींवर हल्ला केला, परवा तामिळ भाषिकांवर आक्रमण केलं आणि अशा उद्योगधंद्यांशी संबंधित नागरिकांनी महाराष्ट्र सोडला, तर त्याचा फटका राज्यालाच बसणार आहे.या पार्श्वभूमीवर चौधरी म्हणाले की, हे सर्व घडल्यानंतर पुन्हा ठाकरे बंधू भाजपावर दोष ढकलतील आणि स्वतःची चूक झाकतील. त्यांच्या एकत्र येण्याचा विपरीत परिणाम होणार असून, कोणत्याही मराठी माणसाला आपल्या देशातील दुसऱ्या नागरिकावर अन्याय झालेला पाहणं नक्कीच आवडणार नाही. कारण अशा अन्यायाचा परिणाम शेवटी आपल्याला भोगावा लागणार असल्याचे ते बोलताना म्हणाले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!