गुन्हेगारी

श्रीगोंदा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २४ इसमांविरुद्ध कारवाई, ३७.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात विशेष पथकाद्वारे कठोर कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा–पेडगाव रस्त्यावरील सोनवणे वस्ती येथे स्वप्नील खेत्रे याने चालवलेल्या जुगार अड्ड्यावर मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला. या कारवाईत २२ जणांना अटक करण्यात आली असून, २ इसम फरार आहेत. एकूण ३७ लाख ५८ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे छाप्यावेळी जुगार खेळताना काही इसम आढळले. पोलिसांनी पाठलाग करत २२ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २,२२,८०० रुपये रोख, ५,९६,००० रुपये किंमतीचे २० मोबाईल फोन्स व २८,९०,००० रुपये किंमतीची ९ वाहने असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या नावांची नोंद घेण्यात आली असून, दीपक मखरे आणि हेमंत कोथंबिरे हे दोन आरोपी फरार आहेत.

 

सदर प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. ६३७/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचासमक्ष ही कारवाई पार पाडण्यात आली असून अटक आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे श्रीगोंदा परिसरातील जुगार व्यवसायाला मोठा आळा बसला आहे.

 

तसेच, जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतही आणखी एक कारवाई करण्यात आली. नगर-जामखेड रोडवरील हॉटेल कृष्णा येथे अवैध विदेशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकून ११,०२५ रुपयांचा विदेशी दारू व बिअर साठा जप्त केला. या कारवाईत तुकाराम रामराव ढोले (रा. सारोळा) यास अटक करण्यात आली असून, गु.र.नं. ३५९/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे (अहिल्यानगर), श्री. वैभव कलुवमें (अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील (कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली मा. संतोष खाडे (परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक) व त्यांच्या पथकातील पोसई राजेंद्र वाघ, सफो शकील शेख, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ मल्लीकार्जुन बनकर, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ दिगंबर कारखिले, पोहेकॉ उमेश खेडकर, पोकॉ सुनिल दिघे, पोकॉ अमोल कांबळे, पोकॉ जालिदर दहिफळे, पोकॉ दिपक जाधव, पोकॉ विजय ढाकणे यांनी केली. पुढील तपास श्रीगोंदा व जामखेड पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!