
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याची भूमिका राम शिंदे यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. यापूर्वी राम शिंदे यांनी निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली होती. ३० सप्टेंबर रोजी त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेतला होता. त्यामुळे ते प्रत्यक्ष अर्ज दाखल करणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय गटांमध्ये चर्चा सुरू आहे. जागावाटपावरून काही ठिकाणी तिढा कायम असल्याचे सांगितले जात आहे. राम शिंदे यांच्या भूमिकेचाही या चर्चेत महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे.
जिल्हा बँकेच्या २१ संचालक जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, ७ ऑक्टोबर रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.राम शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणुकीची प्रक्रिया पुढे जाणार, हे आगामी घडामोडींनंतर स्पष्ट होणार आहे.



