
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-अमोल बोर्डे
मातुलठाण – रस्ता सुरक्षा महिना अंतर्गत जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे (दि.४) फेब्रुवारी २०२५ रोजी परिवहन आयुक्त कार्यालय व परिसर संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्हा रस्ते सुरक्षा समिती सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये वर्तनात्मक धोका घटकांमध्ये वेग, हेल्मेटचा वापर, मद्यपान करून गाडी चालवणे, सीट बेल्ट वापरणे, सेफ सिस्टीम अॅप्रोच, हॅडनची मॅट्रिक्स यांचा समावेश होता.यासोबतच रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहिती देण्यात आली. या सर्व घटकांचा वापर करत,वापरकर्त्यांच्या वर्तनात्मक घटकांचा अभ्यास करून रस्ते सुरक्षा वाढवण्याचे महत्त्वपूर्ण उपाय सुचवले. तसेच रस्ते सुरक्षा समिती सदस्य यांनी एकत्रित येवून अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षितेच्या बाबतीत जिल्हा रस्ता सुरक्षा कृती आराखडा तयार करण्यासाठीचे मार्गदर्शन परिसर संस्थेचे सुशील पठारे यांनी केले.
यावेळी रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, विजयकुमार मुंडे उपआयुक्त महानगरपालिका, जी. आर. उगले सहा पो. अधीक्षक, भारतकुमार बाविस्कर सदस्य सचिव PWD, विनोद सागरे परिवहन अधिकारी, के. बी. दंडगव्हाळ कार्यकारी अभियंता, एस. डी. शेळके सहाय्यक अधीक्षक अभियंता, श्रीरामपूरचे उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी, रिसायलेंट इंडिया संस्थेचे राजीव चौबे व प्रियांका तर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अभिजित पोटे उपस्थित होते.
