महाराष्ट्र

चितळी महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींचा पाठलाग ‘रोड रोमिओंचा’ बंदोबस्त करा;अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ – अतुल चौधरी

श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांना निवेदन सुपूर्द

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिसरात ‘रोड रोमिओंचा’ वाढता उपद्रव लक्षात घेऊन शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षीतेचा विचार करून या ‘रोड रोमिओंना’पोलिसी खाक्या दाखवून तातडीने बंदोबस्त करावा,अन्यथा शिवसेना स्टाईलने कारवाई करू,असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अतुल चौधरी यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.

 

या संदर्भातील तक्रारीचे निवेदन श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांना 18 नोव्हेंबर रोजी देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, चितळी परिसरात सकाळी कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी मोटारसायकलवर फिरणारे रोड रोमिओ काहीवेळा मुलींचा पाठलाग करतात.महाविद्यालयाच्या गेट समोर थांबून मुलींकडे वाईट नजरेने बघतात,यामुळे चितळी जळगाव तसेच शेजारच्या गावातून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे या प्रकाराची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी रोड रोमिओंवर तातडीने कारवाई करावी,असे चितळीचे सामाजिक कार्यकर्ते अतुल चौधरी यांनी निवेदनात नमूद केले आहे.सदर निवेदनाच्या प्रती श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाणे तसेच चितळी ग्रामपंचायत तसेच न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

 

श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांनी सदर तक्रारीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की,या विषयावर महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला आहे.विद्यार्थिनींनी अशा घटना घडल्यास जबाबदारीने पुढे येऊन तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे.मुलींनी या टवाळखोरांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये,तसेच शाळा महाविद्यालयातून घरी जाताना विशेष काळजी घ्यावी.कोणी रोड रोमिओ पाठलाग करत असल्यास सतर्कता बाळगावी असे घडल्यास ही माहिती आपल्या पालकांना वर्गशिक्षकांना तसेच चितळी बिटचे अंमलदार रामेश्वर ढोकणे यांना तात्काळ द्यावी.त्या मोटरसायकलचा नंबर किंवा मोबाईलमधून फोटो घेत ठेवावा आणि तो पोलीस प्रशासनाकडे द्यावा,महिला तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन मदतीला प्रथम प्राधान्य देत आहे.त्यासाठी महाविद्यालय प्रशासन आणि पालकांनीही सतर्कता ठेवून सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.अशा प्रकारांची माहिती मिळताच ‘रोड रोमिओंविरुद्ध’ पोलीस प्रशासनाकडुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांनी दिला आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!