अहिल्यानगर जिल्हा

उच्च न्यायालयात एकनाथ घोगरे यांची याचिका फेटाळली; डॉ. सुजय विखे पाटील यांचा जिल्हा बँकेतील मार्ग मोकळा!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी एकनाथ घोगरे यांची याचिका छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे डॉ. विखे पाटील यांच्या उमेदवारीवरील न्यायालयीन आव्हान दूर झाले असून, राहाता सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीवर विरोधी उमेदवार एकनाथ घोगरे यांनी हरकत घेतली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी ही हरकत फेटाळून लावली. या निर्णयाविरोधात घोगरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

या याचिकेवर न्यायमूर्ती मंजुषा अजय देशपांडे यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने घोगरे यांची याचिका फेटाळली. त्यामुळे डॉ. विखे पाटील यांच्या उमेदवारीला न्यायालयात दिलेले आव्हान निष्प्रभ ठरले.

 

या प्रकरणात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने अॅड. विनायक होन आणि अॅड. अभय ओस्तवाल यांनी बाजू मांडली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अॅड. सुभाष तांबे, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने अॅड. साहेबराव कदम यांनी काम पाहिले.

 

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. राहाता सेवा संस्था मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा बँकेच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!