कोपरगाव तालुका

कोपरगावच्या सतीश सांगळेंची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक औषध आयुक्तपदी निवड; कोल्हे साखर कारखान्यात सत्कार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव-कोपरगावचे भूमिपुत्र सतीश भाऊसाहेब सांगळे यांनी सहाय्यक औषध आयुक्त या पदाला एमपीएससी मार्फत गवसणी घातली असून,हे त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या उच्च पदावर जाणे ही,सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे.कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात या निवडीमुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोपरगाव तालुक्यातील सोनारी सारख्या ग्रामीण भागातून त्यांनी शालेय शिक्षण घेऊन कठोर परिश्रम, सातत्य व गुणवत्तेच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली असून दिल्ली येथे ड्रग्स इन्स्पेक्टर म्हणून भारत सरकारच्या सेवेत कार्यरत असताना त्यांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांनी सहाय्यक औषध आयुक्त पदावर विराजमान होऊन कोपरगाव तालुक्यासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी केली असल्याचे गौरवोद्गार युवा नेते विवेक कोल्हे यांनी काढले.

 

कोपरगाव तालुक्याचे सुपुत्र सतीश भाऊसाहेब सांगळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतीच सहायक औषध आयुक्त या पदावर निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना येथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे तसेच युवा नेते व चेअरमन विवेक भैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते विवेक कोल्हे मनोगत व्यक्त करत असताना बोलत होते.या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे,चेअरमन विवेकभैय्या कोल्हे, भाऊसाहेब सांगळे, प्रकाश सांगळे, देविदास दौंड, राजेंद्र सांगळे, अमोल दौंड, राहुल सांगळे तसेच साखर कारखान्याचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोल्हे कारखान्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

सतीश भाऊसाहेब सांगळे यांनी रवंदा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी बारामती येथील एस.व्ही.पी.एम. कॉलेजमध्ये फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे त्यांना ऑल इंडिया १७ वा क्रमांक मिळाला. येथे त्यांनी फार्मास्युटिक्स विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे मोहाली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांची डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, हैदराबाद येथे कॅम्पस प्लेसमेंट झाली. तेथे त्यांनी दोन वर्षे रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम केले.सन २०१६ मध्ये यूपीएससी आयोगामार्फत ड्रग्स इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून गेल्या आठ वर्षांपासून ते दिल्ली येथे कार्यरत आहेत.नुकतीच एमपीएससी आयोगामार्फत सहायक औषध आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!