
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – २०२४ मध्ये अहिल्यानगर लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढवून विजय मिळविलेले खासदार नीलेश लंके यांनी आता आपला पुढचा प्लॅन जाहीर केला आहे. २०२९ मध्ये आपण पारनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कोणाची तरी जिरवायची होती म्हणून २०२४ ला लोकसभा निवडणूक लढलो, असे सांगत त्यांनी आपला पुढचा प्लॅन सांगितला आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. त्या दौऱ्यात त्यांनी ही घोषणा केली आहे. ढवळपुरी व टाकळी ढोकेश्वर गटात बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधताना ते म्हणाले, “कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढविली; मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे. २०२९ मध्ये मुंबईत सक्रिय राजकारण करण्याचा आपला निर्धार आहे. ज्या ठिकाणी अन्याय होईल, तिथे संघर्ष करा, धाक निर्माण करा आणि गरज पडल्यास आंदोलन करा. निवडणुका संपल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही, त्यामुळे गावोगाव संघटित होऊन जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करा. कार्यकर्ता हा रेसच्या घोड्यासारखा असला पाहिजे. मी आजही २०-२० तास काम करतो. झाले गेले गंगेला मिळाले. नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेने कामाला लागा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” असेही म्हणाले
२०२४ लोकसभा निवडणूक तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि लंके यांच्यात रंगतदार लढत झाली होती. यामध्ये लंके यांनी डॉ. विखे यांचा पराभव केला. त्यावेळी ही लढत खूप गाजली. अजूनही या निवडणुकीची चर्चा होत आहे. त्यावरून आता लोकसभेची पुढची लढत कशी असेल, याचे चित्र रंगवायला सुरवात झाली आहे. त्यातच आता लंके यांनी पुन्हा विधानसभा लढविण्याचा आणि मुंबईत सक्रिय होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पारनेरमधून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे काशिनाथ दाते आमदार आहेत. त्यांनी राणी लंके यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता लंके स्वतः निवडणुकीत उतरून पुन्हा पारनेरवर वर्चस्व मिळविण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.




