
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता- नगरपरिषदेमध्ये आज शिवसेना नेते व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र संताप व्यक्त केला. कारण असे की, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे स्थानिक खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांच्या शासकीय कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव व छायाचित्र छापले गेले नव्हते.
शासकीय प्रोटोकॉलनुसार स्थानिक खासदारांचा उल्लेख व छायाचित्र असणे अनिवार्य आहे. मात्र, केवळ विखे परिवाराचा उदो-उदो करण्यासाठी सत्तेचा उघड गैरवापर होत असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला.
यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते गणेश सोमवंशी, सोमनाथ गोरे, नाना बावके, गोरख वाकचौरे, दीपक टाक, संदीप सोनवणे, यश गोऱ्हे, अमोल खपते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला.स्थानिक खासदारांचा उल्लेख न करणे हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत त्यांनी निषेध नोंदवला. यामुळे नगरपरिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.




