Uncategorized

अहिल्यानगरात वाळू माफियांना विशेष पोलीस पथकाचा जबर झटका;८ आरोपी गजाआड ६१ लाखांचा डंपर ताफा पोलिसांच्या जाळ्यात!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर –  जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक यावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली होती. १९ जुलै २०२५ रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील नांदगाव येथील कापरी नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून कारवाई केली असता काही इसम जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ती डंपरमधून वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिस पथकाने पाठलाग करून एक डंपर चालकास ताब्यात घेतले आणि चार डंपर, एक मोटारसायकल व एक जेसीबी असा एकूण ६१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, या अवैध कारवाईत एकूण आठ आरोपी सहभागी होते, त्यापैकी सात आरोपी फरार आहेत. जप्त केलेल्या डंपरमध्ये प्रत्येकी चार ब्रास वाळू भरलेली होती. या प्रकरणातील आरोपींमध्ये चालक अभिषेक साळवे (अटक), तर मालक अथवा सहभागी म्हणून प्रमोद जाधव, गणेश माळी, अकिल शेख, काशिनाथ माळी, सुनिल माळी, शुभम पुंड आणि सादिक शेख (सर्व रा. नांदगाव, ता.अहिल्यानगर) हे फरार आहेत. या सर्वांनी संगनमत करून नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून ती डंपरमधून वाहून नेण्याचा आणि विक्री करण्याचा प्रयत्न केला होता.

 

या कारवाईत टाटा कंपनीचे चार डंपर (१६९३, १६१३ आणि १६१८ मॉडेल), बजाज पल्सर मोटारसायकल आणि वाळू भरण्यासाठी वापरलेली जेसीबी मिळून एकूण ₹६१,१०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५६२/२०२५ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३०५ (ई), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त वाळूची अधिकृत पाहणी करण्यात आली असून आठ ब्रास वाळू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश खेडकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अरविंद भिंगारदिवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल दिघे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे, पोलीस कॉन्स्टेबल विजय ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर दहिफळे यांच्या विशेष पथकाने संयुक्तरित्या केली. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला असून अवैध वाळू उत्खननावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!