
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पाथर्डी – अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत ४ लाख ६५ हजार १२० रुपयांच्या विदेशी दारुचा साठा व दोन धारधार शस्त्रे जप्त केली असून, या प्रकरणात ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
३० जून २०२५ रोजी पाथर्डी शहरातील एडके कॉलनी परिसरात काही इसम विनापरवाना विदेशी दारुचा साठा बाळगून विक्री करत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकून दोन आरोपी – काल्या उर्फ तौफीक निजाम शेख (वय २७) आणि अल्ताफ रशीद शेख (वय २२) – यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ४,६५,१२० रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
त्यानंतर, भांडकर वाईन शॉपच्या मागे असलेल्या रॉयल स्टार पान टपरीत दोन इसम धारधार शस्त्र बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून रंगनाथ दिलीप गायकवाड (वय २६) आणि इशान हारुन शेख (वय २६) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन कोयते तसेच मावा तयार करण्याचे मशिन (किंमत अंदाजे ३०,०००/- रुपये) जप्त करण्यात आले.
या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण ४ आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी पाथर्डी शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई केली.
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आणि त्यांच्या विशेष पथकाने केली. या पथकामध्ये खालील पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते – पोसई राजेंद्र वाघ, सफौ शकील शेख, पोहेकॉ शंकर चौधरी, अजय साठे, अरविंद भिंगारदिवे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, पोकों सुनिल दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दिपक जाधव आणि जालिंदर दहिफळे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
