(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. राहाता तालुक्यातील २३ हजार ८७२ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे एकूण ४ कोटी ७७ लाख ४४ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. यापूर्वी योजनेचे २३ हप्ते वितरित करण्यात आले असून, आता २४ वा हप्ता जमा झाला आहे.
शेतीच्या हंगामात बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मिळणारी मदत शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.
योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असून, योजनेची सातत्यपूर्ण अंमलबजावणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण यश असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४४ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १०८ कोटी ९५ लाख २४ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामध्ये राहाता तालुक्यातील २३ हजार ८७२ शेतकऱ्यांना ४ कोटी ७७ लाख ४४ हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे.