(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४४ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे एकूण १०८ कोटी ९५ लाख २४ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असून, योजनेची सातत्यपूर्ण अंमलबजावणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण यश असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या विविध खर्चांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते, असे विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ५ लाख ४४ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या खात्यात १०८ कोटी ९५ लाख २४ हजार रुपये जमा झाल्याचे सांगताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, शेतीच्या हंगामात बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मिळणारी मदत विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरते.
या योजनेचे यापूर्वीचे २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, आता २४ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना सुरू केल्या असून, त्यांची अंमलबजावणी सातत्याने सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. किसान सन्मान निधीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तालुकानिहाय लाभार्थी आणि निधीचे वितरण
अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, अकोले तालुक्यातील ३४ हजार ५०८ शेतकऱ्यांना ६ कोटी ९० लाख रुपये, जामखेडमधील २९ हजार ९४६ शेतकऱ्यांना ५ कोटी ९८ लाख रुपये, कर्जत तालुक्यातील ४३ हजार ५३९ शेतकऱ्यांना ८ कोटी ७० लाख रुपये आणि कोपरगावमधील २७ हजार ६५ शेतकऱ्यांना ५ कोटी ४१ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
अहिल्यानगर तालुक्यातील ३० हजार ५५७ शेतकऱ्यांना ६ कोटी १२ लाख रुपये, नेवासा तालुक्यातील ५३ हजार ५३१ शेतकऱ्यांना १० कोटी ७० लाख रुपये, पारनेरमधील ५० हजार शेतकऱ्यांना १० कोटी रुपये आणि पाथर्डी तालुक्यातील ३९ हजार ८५३ शेतकऱ्यांना ७ कोटी ९७ लाख रुपये मिळाले आहेत.
राहाता तालुक्यातील २३ हजार ८७२ शेतकऱ्यांच्या खात्यात ४ कोटी ७७ लाख रुपये, राहुरीतील ३८ हजार १९५ शेतकऱ्यांना ७ कोटी ६३ लाख रुपये, तर संगमनेर तालुक्यातील ५८ हजार ५७६ शेतकऱ्यांना ११ कोटी ७१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
शेवगाव तालुक्यातील ४२ हजार ३८१ शेतकऱ्यांना ८ कोटी ४७ लाख रुपये, श्रीगोंदा तालुक्यातील ५० हजार ४४७ शेतकऱ्यांना १० कोटी ८९ लाख रुपये आणि श्रीरामपूर तालुक्यातील २२ हजार २३९ शेतकऱ्यांना ४ कोटी ४४ लाख रुपये वितरित झाल्याची माहिती देण्यात आली आहे.किसान सन्मान निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळत असून, या योजनेमुळे शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागत आहे.