अहिल्यानगर जिल्हाआमदार विवेकभैय्या कोल्हेकोपरगाव तालुका

कासलीचा १३ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार – आ.विवेक कोल्हे

दहेगाव बोलका उपकेंद्रांतर्गत दहा गावांतील ४ हजार ३८२ वीजग्राहकांना होणार लाभ

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – तालुक्यातील कासली येथे ४० एकर क्षेत्रात उभारण्यात आलेला १३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाच्या फिडरसंदर्भातील अडचणी दूर करून तो लवकर सुरू करण्यासाठी आ. विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून, उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे.

 

या सौर ऊर्जा प्रकल्पातून ११ केव्ही वीजवाहिनीद्वारे ३३/११ केव्ही दहेगाव बोलका उपकेंद्राला सौर वीज उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे दहेगाव बोलका उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव, कासली, लौकी, गोधेगाव, घोयेगाव, आपेगाव, तिळवणी, शिरसगाव, सवळगाव आणि उक्कडगाव या दहा गावांतील वीजग्राहकांना लाभ होणार आहे. या गावांमधील पाच कृषी फिडरद्वारे शेतीपंपांना वीजपुरवठा केला जातो.या परिसरात एकूण ४ हजार ३८२ वीजग्राहक आहेत. यामध्ये २ हजार २०० कृषी पंप वीजग्राहक, २ हजार ३० घरगुती वीजग्राहक, ८९ व्यावसायिक वीजग्राहक, ३५ औद्योगिक वीजग्राहक आणि २८ इतर वीजग्राहकांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे कार्यान्वयन परिसरातील कृषी वीजग्राहकांसह घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहे.

 

सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कृषी फिडरवरील वीजपुरवठ्याचे नियोजन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनाचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने या प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे.

 

कासली येथील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या फिडरसंदर्भातील अडचणी दूर करून प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा, यासाठी आ. विवेक कोल्हे यांनी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून, लवकरच प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आ. विवेक कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!