अहिल्यानगर जिल्हाश्रीरामपूर तालुका

जिल्हा परिषद शाळेच्या श्लोक कासारची गरुडझेप; ‘इस्रो’च्या विशेष उपक्रमासाठी झाली निवड!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपुर – तालुक्यातील गोंडेगाव येथील पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणारा हुशार विद्यार्थी श्लोक गणेश कासार याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या विशेष शैक्षणिक व संशोधन उपक्रमासाठी श्लोकची निवड झाली असून, त्याच्या या यशामुळे संपूर्ण शाळेचा आणि गोंडेगावचा नावलौकिक वाढला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, श्लोकवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्लोक हा शाळेत हुशार, अभ्यासू आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी म्हणून परिचित आहे. शालेय शिक्षणाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची त्याला विशेष आवड आहे. त्याने विविध स्पर्धा परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि मंथन शिष्यवृत्ती परीक्षांमध्येही आपले कौशल्य आजमावले आहे. सातत्याने नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा, अभ्यासातील आवड आणि विविध परीक्षांमध्ये सहभागी होण्याची तयारी या गुणांमुळे त्याच्या शैक्षणिक वाटचालीला दिशा मिळाली आहे. इस्त्रोच्या शैक्षणिक व संशोधन उपक्रमासाठी झालेली निवड ही त्याच्या गुणवत्तेची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन यांसारख्या क्षेत्रांविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा शैक्षणिक उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. श्लोकच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करण्याची प्रेरणा मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता असते, हे श्लोकने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.

श्लोकच्या या यशाबद्दल गावचे सरपंच सागर बढे, आप्पासाहेब थोरात, भारत बढे, संदीप पोखरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र थोरात, अरविंद ढगे आणि रावसाहेब बढे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी श्लोकचे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्लोकने मिळवलेले यश हे गोंडेगावसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

श्लोक हा गोंडेगावच्या उपसरपंच लताताई कासार आणि माजी ग्रामपंचायत सदस्य विजयराव कासार यांचा नातू आहे. त्याला शाळेतील पंडित सर यांच्यासह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शालेय उपक्रमांमधील सहभाग महत्त्वाचा ठरतो. श्लोकच्या यशातही त्याला मिळालेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.

श्लोकच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ. ज्ञानेश्वरी ढगे, सौ. छाया कासार यांच्यासह गोंडेगावातील पालक आणि ग्रामस्थांनी त्याचे कौतुक केले. त्याच्या यशामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्लोकने भविष्यातही अशाच प्रकारे यशाची नवनवीन शिखरे गाठावीत आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्याला देण्यात येत आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!