
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – शेवगाव शहरातील शिवनगर परिसरात अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या कुंटणखान्यावर (वेश्या व्यवसायावर) पोलिसांनी मोठी छापामार कारवाई करत १७ पीडित महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्ष क सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे प्रभारी अधिकारी संतोष खाडे यांनी केली असून या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. यानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री. संतोष आ. खाडे हे शेवगाव शहरात माहिती घेत असताना, दिनांक १७ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजता गुप्त बातमीदारामार्फत शिवनगर येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली.
तात्काळ कारवाई करत पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याच्या सूचनेनंतर पंचासह पोलिसांनी छापा टाकला असता गणेश लक्ष्मण शिंदे (वय ३५, रा. शिवाजीनगर, शेवगाव) हा आरोपी मिळून आला. चौकशीत त्याने शबाना सैय्यद पठाण (रा. नेवासा रोड, शेवगाव) हिच्यासह मिळून हा अवैध व्यवसाय चालवत असल्याची कबुली दिली. घटनास्थळी दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी एक पुरुष व एक महिला आढळले, तर तिसऱ्या खोलीत १५ महिला आढळल्या. चौकशीत महिलांनी सांगितले की, त्यांना फसवून, पैशाचे आमिष देऊन व दबाव टाकून या व्यवसायात ढकलले गेले होते.
या कारवाईतून एकूण १७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, शेवगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३८/२०२५ अन्वये भारतीय नवसंहितेचे (BNS 2023) कलम १४३ (अनैतिक देहव्यवहारासाठी व्यक्तींची फसवणूक करून काम करण्यास भाग पाडणे), तसेच पिटा अॅक्ट 1956 चे कलम ३, ४, ५, ७ व ८ (वेश्याव्यवसाय चालवणे, जागा उपलब्ध करून देणे, आर्थिक लाभ घेणे, संरक्षण देणे, इ.) या कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे (अहिल्यानगर), श्री. वैभव कलुबर्मे (श्रीरामपूर विभाग), आणि श्री. सुनिल पाटील (उपविभागीय अधिकारी, शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोहेकॉ भिंगारदिवे, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, अजय साठे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, सुनिल दिघे आणि शेवगाव पोलीस स्टेशनचे पोसई खेडकर, पोहेकॉ आकाश चव्हाण, पोकॉ शिरसाठ व पोकॉ अंगरखे यांचा समावेश होता.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या परिसरात अशा प्रकारचे बेकायदेशीर व अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल. जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कठोर मोहिम सुरू असून, अशा कारवायांना अधिक तीव्रतेने चालना देण्यात येणार आहे.
