(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
संगमनेर – शहरात कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुटका केली. या कारवाईत तब्बल ५७ गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, त्यांची एकूण किंमत १९ लाख ६० हजार रुपये आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दोघे फरार आहेत.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अवैध गोवंशीय जनावरांच्या कत्तलीविरोधात विशेष पथके तयार केली होती. त्यानुसार २ नोव्हेंबर २०२६ रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.
पहिल्या कारवाईत ४८ जनावरे जप्त
पहिल्या छाप्यात पोलिसांनी १६ लाख रुपये किमतीची ४८ गोवंशीय जनावरे जप्त केली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०३७/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सोहेल समीर शेख (वय २७, रा. कुरण, ता. संगमनेर) याचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे.
दुसऱ्या छाप्यात ९ जनावरांची सुटका
दुसऱ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ६० हजार रुपये किमतीची ९ गोवंशीय जनावरे जप्त केली. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १०३८/२०२६ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वसीम शेख आणि सद्दाम कुरेशी (दोघेही रा. कुरण, संगमनेर) यांची नावे असून, दोघेही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अवैध कत्तलीविरोधात पोलिसांची कारवाई
संगमनेर शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी छापे टाकून ५७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आल्याने अवैध गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा अवैध प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या व्यवसायामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्याचे आव्हानही महत्त्वाचे ठरणार आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.