
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील कोऱ्हाळे येथे शनिवार, 16 ऑगस्ट 2025 रोजी भयंकर कौटुंबिक हत्याकांड उघडकीस आले. एका पित्याने आपल्या चार चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून देत ठार केले आणि त्यानंतर स्वतःही दोरीने हातपाय बांधून त्याच विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण राहाता तालुका हादरला असून घटनेची माहिती मिळताच राहाता व शिर्डी पोलीस स्टेशनच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाने सदर घटनेचा सखोल तपास सुरु केला आहे.

कोऱ्हाळे गावातील स्थानिक नागरिक आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने सर्व मृतदेह विहिरीतून बाहेर काढन्याचे काम सुरु असून चौकशीत मृतांची ओळख पटवली असता, हे मृतदेह अरुण सुनील काळे (वय अंदाजे 35, रा. चिखली कारेगाव, ता. श्रीगोंदा) आणि त्याची चार मुले – शिवानी (8), प्रेम (7), वीर (6) व कबीर (4) असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण काळे काही दिवसांपासून पत्नीपासून वेगळा राहात होता. घटनेपूर्वी त्याने पत्नीशी फोनवर वाद घालत धमकी दिली, “तू परत ये नाहीतर मुलांना मारून टाकीन”, आणि लगेच फोन कट केला. त्यानंतर त्याने नगर तालुक्यातील वीरभद्र प्राथमिक शाळा,बारदरी येथे जाऊन शिक्षकांना खोटं सांगून मुलांना कटींग करण्याच्या बहाण्याने शाळेतून घरी आणले.

त्यानंतर अरुण काळे आपली मोटरसायकल एम एच 16 डी एल 1944 वर आपल्या चार मुलांसह येवल्याच्या दिशेने जात होता. तो राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे-केलवड शिवारातील विहिरीजवळ थांबला तिथे त्याने टोकाचे पाऊल उचलले, तिथे संतापाच्या भरात त्याने सोबत असणाऱ्या चार चिमुकल्या मुलांना निर्दयपणे गट क्रमांक 269 मधील विहिरीत ढकलून दिले आणि स्वतः उजव्या हाताला व पायाला दोरी बांधून विहिरीत उडी मारली. अरुण काळे यांचा मृतदेह तरंगताना दिसल्याने ही घटना स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आली. आणि तात्काळ पोलीस ठाण्याला खबर दिली.विहीर सुमारे 50 फूट खोल असून अंदाजे 35 ते 40 फूट पाणी असल्यामुळे मृतदेह शोधण्यात मोठी अडचण निर्माण झाली.या घटनेत अरुण काळे, त्याची मुलगी शिवानी व मुलगा वीर यांचे मृतदेह तत्काळ बाहेर काढण्यात आले. उर्वरित प्रेम व कबीर यांचा शोध सुरु असताना पावसामुळे अडथळा निर्माण झाला. तरीही पोलीस प्रशासन व राहाता नगरपालिका प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, राहाता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. या हृदयद्रावक घटनेने कोर्हाळे परिसरात शोककळा पसरली असून, पित्याने आपल्या पोटच्या चिमुकल्यांचे जीवन हिरावून घेतल्याने समाजात “बापचं झाला वैरी” याचा प्रत्यय सर्वांना आला आहे. पोलिसांनी प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.




