
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील जळगाव येथे नर-मादी बिबट्याच्या जोडीने मोठा धुमाकूळ घातला असून शिवाजी अण्णासाहेब चौधरी यांच्या वस्तीवर भक्षाच्या शोधात आलेल्या नर-मादी बिबट्याच्या जोडीने श्वानावर हल्ला केला असून या हल्ल्यातून श्वान थोडक्यात बचावले आहे शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली यामुळे शेतवस्तीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी मोठी भीती व्यक्त केली असून वनविभागाने जळगाव परिसरात तात्काळ पिंजरे लावून बिबट्याना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सविस्तर घडलेला घटनाक्रम असा की,शिवाजी अण्णासाहेब चौधरी यांच्या वस्तीवर शुक्रवार (दि.२५) साडे आठ वाजेच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या भेंडीच्या शेतात सदर नर-मादी बिबट सायंकाळ पासुन दबा धरून बसले होते नर-मादी बिबट हळुवारपणे गायांच्या गोठ्यापाशी आले दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाळीव श्वानावर झडप घातली हल्ला केला पाळीव श्वान व बिबट्यात झटपट झाली त्यानंतर पाळीव श्वानावर हल्ला केला यावेळी यावेळी त्यांनी घराचा दरवाजा उघडून बघितले असता त्यांना नर-मादी बिबट श्वानाची शिकार करत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी बिबट्याचा हल्ला होण्याच्या काही वेळ आधी शिवाजी चौधरी यांच्या घरातील सदस्य नेहमी प्रमाणे घराशेजारील गायांच्या गोठ्यात नियमित काम करत होते त्यावेळी त्यांचा चिमुकला मुलगा अंगणात खेळत होता आपले काम आटपून घरात आले तेवढ्यात या झटापटीचा आवाज श्रीकांत चौधरी यांच्यासह घरातील सदस्यांना ऐकू आला घराजवळ नर-मादी बिबट दिसून आल्याने ते घाबरले यावेळी त्यांनी मोठी आरडाओरड केली तरीही नर-मादी बिबट हे जागेवरून क्षणमात्र हालले नाही.
यावेळी त्यांनी मोठा आवाज करत बिबट्याला हटवण्याचा प्रयत्न केला तरीही बिबटे घराजवळ बराच वेळ तळ ठोकून बसले होते शेवटी फटाके फोडल्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली असून शेजारच्या वस्तीकडे पलायन केले असून घराजवळच त्यांचे वास्तव्य आहे जळगावातील वाघ वस्ती, मेडिकल वस्ती, लालवाडी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार होत असल्याचे नागरिकांनी सांगितले असून ऊस, गिन्नीगवत, द्राक्ष,आंब्याच्या बागेत बिबटे लपत असून त्यांना मुबलक भक्षही मिळत आहे.यामुळे लोकवस्तीत त्यांचा वाढता प्रभाव दिसून येत आहे.
वेळीच खबरदारी घेवून प्रसंगवधान राखल्यामुळे चौधरी कुटुंबातील सदस्य बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले असून खूप मोठा अनर्थ घडता घडता टळला आहे या परिसरात मागील अनेक महिन्यापासून तसेच दिवसेंदिवस लोकंवस्तीत बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांनी या गोष्टीचा मोठा धसका घेतला असून शेतकरी दिवसाही शेतात येण्यास घाबरत असून वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेवून परिसरात पिंजरे लावून बिबट्याना जेरबंद करून नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी जळगावातील नागरिकांनी केली आहे.




