(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव : समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ६९ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मध्य प्रदेशातील ४७ वर्षीय ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई २४ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहिती घेत असताना समृद्धी महामार्गावरून गुटखा आणि पानमसाल्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किरण धन्यकुमार जगदाळे यांना माहिती देण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पंचांसह नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला. यावेळी संशयित आयशर ट्रक क्रमांक डीडी-०१-एए-९५४४ आढळून आला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळला.
या कारवाईत २७ लाख रुपये किमतीचा प्रीमियम राजनिवास सुगंधित पानमसाल्याची १८ हजार पाकिटे आणि १७ लाख २८ हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखूची १८ हजार पाकिटे जप्त करण्यात आली. याशिवाय २५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रकही जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ६९ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणातील ट्रकचालक दिनेश रामचंद शर्मा (वय ४७, रा. द्वारकापुरी, इंदूर, मध्य प्रदेश) याला जप्त मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) तसेच इतर लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि त्यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने केली.