(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – पुणे येथे आयोजित विभागीय स्तरावरील शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, लोणीच्या कॅडेट्सनी चमकदार कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत पदकांची कमाई केली. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या तीन कॅडेट्सची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली अशी माहीती प्राचार्य राजेश माघाडे यांनी दिली.
स्पर्धेत कॅडेट आदित्य कुमार सिंह याने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक, तर १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले. तिहेरी उडी या प्रकारात १७ वर्षांखालील गटात कॅडेट रुद्रप्रताप जाधव, तर १९ वर्षांखालील गटात कॅडेट भूषण ढोबळे यांनी रौप्यपदकांची कमाई करत राज्यस्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
याशिवाय ४ × ४०० मीटर रिले स्पर्धेत सैनिक स्कूलच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत सांघिक खेळातील समन्वय आणि जिद्दीचे दर्शन घडवले.कॅडेट्सनी मिळवलेले हे यश नियमित सराव, कठोर परिश्रम आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, कमांडंट कर्नल सुभाष घोडगेरी, प्राचार्य राजेश माघाडे, क्रीडा प्रशिक्षक प्रशांत देशमुख तसेच शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे, डॉ. महेश खर्डे आदींनी अभिनंदन केले आहे.