अहिल्यानगर जिल्हा

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश देत पायरेन्सच्या आरोग्य आणि शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय एकता दिन साजरा

विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पायरेन्स संस्थेच्या आयबीएमए, डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक महाविद्यालय आणि पायरेन्स पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देशाची एकता व अखंडता जपण्याची शपथ घेतली.

पायरेन्स संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्या प्रेरणेतून संस्थेत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. संस्थेचे सचिव व संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आयबीएमएचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी, आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना साठे आणि नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य अजमुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. संजय औताडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतर देशातील ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यामध्ये पटेल यांनी बजावलेली ऐतिहासिक भूमिका त्यांनी विशद केली. जुनागढ आणि हैदराबाद संस्थानांच्या विलीनीकरणासाठी त्यांनी दाखविलेली मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध भाषा, धर्म आणि संस्कृतींनी नटलेल्या भारताची एकात्मता जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशाची एकता, अखंडता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव टिकविण्यासाठी युवा पिढीने सदैव कटिबद्ध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. तीनही महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली. 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!