अहिल्यानगर जिल्हापुणतांबाराहाता तालुका

पुणतांब्यात देवीच्या मिरवणुकीतील वादातून दोन गटांत हाणामारी; दुचाकींसह स्कुटी पेटवली

धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड व दगड-विटांचा वापर; दोन्ही गटांकडून जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

पुणतांबा – नवरात्र विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाचे पडसाद पुणतांबा येथे उमटले असून, वडारवाडा परिसरात दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि दगड-विटांचा वापर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संघर्षात अनेक जण जखमी झाले असून, जखमींवर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमागे यापूर्वी झालेल्या मारहाणीच्या तक्रारीचा तसेच नवरात्र विसर्जन मिरवणुकीतील वादाचा संदर्भ असल्याचे दोन्ही बाजूंच्या फिर्यादीतून समोर आले आहे. संदीप धोंडीराम गायकवाड (वय ४३, रा. श्रीकृष्णनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विक्रम तरुण मंडळाच्या काही तरुणांनी २१ ऑक्टोबर रोजी सेंट्रल रेल्वेच्या मुलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी तक्रार दिली होती. याच कारणावरून काही जणांनी कोयता, तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या हल्ल्यात भांडण सोडवण्यासाठी आलेले सूरज गायकवाड, दीपक गायकवाड, अंकुश गायकवाड आणि दीपक कुऱ्हाडे जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच संदीप गायकवाड यांची दुचाकी आणि रेखा कुऱ्हाडे यांच्या मुलाची स्कुटी पेटवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गळ्यातील सोन्याची साखळी, अंगठी आणि मोबाईल नेल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

दुसरीकडे, आदित्य विजय काळे यांनीही स्वतंत्र फिर्याद दिली आहे. नवरात्र विसर्जन मिरवणुकीतील वादातून सूरज गायकवाड, दीपक गायकवाड, संतोष कुऱ्हाडे, दीपक कुऱ्हाडे, आदेश गायकवाड, विवेक गायकवाड यांच्यासह अन्य व्यक्तींनी चॉपर, चाकू, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या हल्ल्यात पोटात चॉपर खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तसेच धमकी दिल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून राहाता पोलिस ठाण्यात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा पुढील तपास राहाता पोलिस करीत आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!