अहिल्यानगर जिल्हानेवासा तालुका

शेवग्याच्या शेतात गांजाची लागवड; सोनईत पोलिसांचा छापा!

वाटापूरमध्ये ५.१० किलो गांजाची झाडे जप्त; ८१ वर्षीय वृद्धासह दोघे ताब्यात

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

नेवासा – शेवग्याच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार नेवासा तालुक्यातील वाटापूर येथे उघडकीस आला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शेतातून ५.१० किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या गांजाची किंमत अंदाजे २ लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, वाटापूर येथील रखमाजी कुशाबा आयनर यांनी वाट्याने घेतलेल्या शेतात शेवग्याच्या पिकामध्ये गांजाची लागवड केली आहे. या माहितीची नोंद सोनई पोलीस ठाण्याला लेखी अहवालाद्वारे देण्यात आली.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनई पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष संबंधित शेतात छापा टाकला. यावेळी शेवग्याच्या झाडांमध्ये गांजाची लहान-मोठी झाडे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाची झाडे जप्त केली.

या कारवाईत रखमाजी कुशाबा आयनर (वय ८१, रा. वाटापूर, ता. नेवासा) आणि सोपान गुजाबा रूपनर (वय ४६, रा. अंमळनेर, ता. नेवासा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावरून ५.१० किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत २ लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५३/२०२६ नुसार अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने आणि सोनई पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी ही संयुक्त कारवाई केली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!