अहिल्यानगर जिल्हा

कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना सुरक्षा आणि सुविधा सर्वोच प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात- पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील 

सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर शिर्डीतील सेवा सुविधा बाबत आढावा बैठक संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ काल ध्वजारोहणाने नाशिक, त्रिंबकेश्वर येथे झाला आहे. येथे येणारा भाविक शिर्डी येथे श्री. साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असून मोठ्या प्रमाणात भाविकांना सुविधा आणि सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणेने युद्ध पातळीवर कामे पूर्ण करावी तसेच गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी कमांड सिस्टीम पोलीस विभागाने कार्यान्वित करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

 शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर परिसरातील झिरो सभागृहात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात ,उपनगराध्यक्ष अभय शेळके, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती , नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सतिष दिघे,यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक, महावितरण, बांधकाम आणि नगरपालिका विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शिर्डी येथील येणारा भाविक तसेच कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन येणारे भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असल्याने त्यांना सुविधा प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनास चांगले नियोजन करावे लागणार आहे.प्राधान्याने पार्किंग, दर्शन रांग व्यवस्था,आरोग्य सुविधा पूर्तता करावी लागणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथून शिर्डी साठी विशेष इलेक्ट्रिकल वातानुकूलित बसेसची व्यवस्था करण्यात यावी. तसेच दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने २४तास सुरू राहील असा कमांड सिस्टीम किंवा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, यामध्ये शहरातील विविध महत्वपूर्ण ठिकाणे, चौक, बस स्थानक तसेच रेल्वे स्टेशन ,विमानतळ, मुख्य रस्ते आणि मंदिर परिसराच्या आजूबाजूच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रणा बाबतच्या सूचना देण्यासाठी साऊंड आणि सीसीटीव्ही सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तात्काळ सादर करावा. तसेच शिर्डी हे वेगाने वाढणाऱ्या शहरात पैकी एक असून या शहराचा विकास हा भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन करण्याबाबत नगरपालिका,बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, महावितरण, आणि पाणीपुरवठा व अंतर्गत सुविधा संबंधित असलेल्या सर्व यंत्रणानी भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन अधिकाधिक सुविधांची उपलब्धता व्हावी यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. 

भाविकांनी शिर्डी येथे भेट द्यावी व यासाठी विविध समाज माध्यमांचा, रिल्स वापर करण्याबरोबरच येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून देखील शिर्डीकडे भाविक आकर्षित होण्याबाबतचे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून करण्यात यावे, सुरक्षा आणि सुविधाला प्राधान्य देत शिर्डीतील भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन बैठकीत पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्वणी काळात शिर्डी येथे येणाऱ्या लाखो भाविकांची शिर्डी आणि परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता मुख्य महामार्ग व जोडरस्त्यांचे रुंदीकरण जलद गतीने पूर्ण करावे. तसेच भाविकांच्या वाहनांसाठी शहराच्या बाहेर मोकळ्या जागांवर सुसज्ज पार्किंग सुविधा उभारण्यात यावेत.

 

  श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी दर्शन रांगांचे व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्रथमोपचार केंद्रांची उभारणी वेळेत करण्याचे आदेश देण्यात आले. शिर्डीत येणाऱ्या एकाही भाविकाची गैरसोय होणार नाही. सर्व संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय साधून दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करावीत. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.” असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!