अहिल्यानगर जिल्हाश्रीरामपूर तालुका

गोंडेगावच्या दोन शिक्षकांना राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर!

पीएम श्री जिल्हा परिषद शाळेचे राजेंद्र पंडित आणि माजी शिक्षक गणेश महाडिक यांचा गौरव; गोंडेगावच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीचा राज्यस्तरावर सन्मान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

गोंडेगाव – शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ यंदा श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक राजेंद्र पंडित आणि याच शाळेचे माजी शिक्षक गणेश महाडिक यांना जाहीर झाला आहे. एकाच शाळेशी संबंधित दोन शिक्षकांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने गोंडेगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण, तंत्रस्नेही आणि समाजाभिमुख शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांची ‘आयडॉल शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड केली जाते. राजेंद्र पंडित यांनी गोंडेगाव पॅटर्नची मुहूर्तमेढ रोवून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि इस्रोशी संबंधित उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. अध्यापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती तसेच लोकसहभागातून शाळेचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

याच शाळेचे माजी शिक्षक गणेश महाडिक यांनी आपल्या कार्यकाळात विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्रामस्थांशी समन्वय साधत शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांनाही राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

एकाच शाळेशी संबंधित दोन शिक्षकांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड होणे ही गोंडेगावसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या यशाबद्दल श्रीरामपूरचे गटशिक्षणाधिकारी, गोंडेगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि शिक्षण विभागातील विविध स्तरांतून राजेंद्र पंडित व गणेश महाडिक यांचे अभिनंदन होत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!