अहिल्यानगर जिल्हानेवासा तालुका

नेवाशात अवैध मावा तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

सुगंधित तंबाखू-मिश्रित मावा, वजनकाटा आणि लोखंडी मशीनसह १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा येथे सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित मावा तयार करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका व्यक्तीविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. नेवासा येथील माळीवस्ती परिसरात राहणारा जावेद फज्जु शेख हा आपल्या राहत्या घरात सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित मावा तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून जावेद फज्जु शेख (वय ३०, रा. माळीवस्ती, नेवासा) याला ताब्यात घेतले.

छाप्यादरम्यान पोलिसांनी विविध रंगांचा सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित तयार मावा, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी मशीन असा एकूण १ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, आजीनाथ पाखरे आणि रमीझराजा आतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.या कारवाईमुळे नेवासा परिसरातील अवैध मावा निर्मिती व विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासातून अवैध मावा निर्मिती आणि विक्रीसंदर्भातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!