अहिल्यानगर जिल्हानेवासा तालुका

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानातून नेवासा तालुक्यात आठ शेतरस्त्यांचे वाद मिटले!

अनेक वर्षांपासून बंद असलेले शेतरस्ते खुले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सामंजस्यातून प्रकरणांचा निपटारा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

नेवासा – महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत नेवासा तालुक्यातील आठ शेतरस्त्यांची प्रकरणे सामंजस्यातून निकाली काढण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून बंद असलेले शेतरस्ते खुले झाल्याने संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे आपापसांतील तडजोडीने आणि परस्पर सहमतीने निकाली काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतरस्त्यांबाबतचे वाद संवाद, समन्वय आणि सामंजस्याच्या माध्यमातून सोडविण्यावर भर दिला जात आहे.

त्यानुसार नेवासा तालुक्यातील प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात आला. मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी बेलपिंपळगाव, फत्तेपूर, बऱ्हाणपूर, तामसवाडी, नेवासा बुद्रुक आणि महालक्ष्मी हिवरे येथील शेतरस्त्यांची प्रकरणे तालुका स्तरावर सामंजस्याने निकाली काढण्यात आली. तसेच बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी प्रांत स्तरावरील हिंगोणी येथील शेतरस्त्याचे प्रकरणही परस्पर सहमतीने सोडविण्यात आले.

शेतरस्त्यांअभावी शेतात जाण्या-येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या निर्णयामुळे दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतरस्त्यांवरून होणारे वाद न्यायालयीन किंवा प्रशासकीय स्तरावर दीर्घकाळ प्रलंबित राहण्याऐवजी परस्पर संवादातून सोडविल्यास शेतकऱ्यांचा वेळ आणि संसाधनांची बचत होण्यास मदत होते. तसेच गावपातळीवरील परस्पर संबंध टिकवून ठेवण्यासही हातभार लागतो.

अधिकाऱ्यांसह समन्वयकांचे विशेष प्रयत्न

या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिरादार, शिव पाणंद शेतरस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, मुख्यमंत्री बळीराजा शिव पाणंद योजनेचे नेवासा तालुका समन्वयक कारभारी गरड, दत्तात्रय गटकळ, ॲड. गणेश निकम, ॲड. स्मिता लवांडे, कानिफनाथ कदम तसेच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

महसूल लोक अदालत अभियानाच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे परस्पर सहमतीने निकाली काढण्याच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. नेवासा तालुक्यात आठ शेतरस्त्यांची प्रकरणे सामंजस्यातून निकाली निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, स्थानिक पातळीवरील वाद संवादातून सोडविण्याच्या या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!