
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता–चितळी मार्गावरील रामपूरवाडी फाटा ते ठमकेवस्ती या अंदाजे चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर असंख्य लहानमोठे खड्डे पडल्याने नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. या संदर्भात ‘अहिल्यानगर खबरबात’ ने ‘चितळी–राहाता रस्त्यावर झाले खड्डेच खड्डे’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केल्यानंतर संगमनेर अंतर्गत राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली.यानंतर अधिकाऱ्यांनी सांगकाम्याची भूमिका घेत ठेकेदाराला बोलावून मुरूम माती व खडी टाकून खड्डे बुजविण्याचे नाटक सुरू केले. मात्र ‘मांजर डोळे झाकून दूध पित असली तरी तिला असे वाटते की मला जग पाहत नाही’ या म्हणीप्रमाणे ठेकेदाराने खड्डे योग्य पद्धतीने बुजविलेच नसल्याने नागरिकांनी या कामावर शंका व्यक्त केली आहे.

शुक्रवारी दुपारी चितळी- राहाता रामपूरवाडी फाटा ते ठमकेवस्ती दरम्यान साधारण चार किलोमीटर पट्ट्यावरील खड्ड्यांवर संबंधित ठेकेदाराने अगदी घाईत डागडुजी करण्याचे कामं सुरु केले.यावेळी ठमकेवस्ती परिसरातील रोडवर असलेल्या काही निवडक खड्ड्यांतच चिकट मुरूम व खडी टाकली.सर्व खड्डे सरसकट बुजवण्याची आवश्यकता असताना अनेक खड्डे तसेच सोडण्यात आले.खडी-डांबर कचखडी आदींचा वापर करण्यापेक्षा मुरुमाचा वापर करण्यात आला त्यावर घाईत रोडरोलर फिरविले मात्र,या कामात कचखडी अथवा डांबराचा वापर म्हणावा असा झालाच नाही त्यामुळे खड्ड्यांची मजबूत पद्धतीने डागडुजी झालीच नसावी कामं खूप गडबडीत सुरु झाल्याने त्यात अतिशय निकृष्ट दर्जाचे मुरूम-खडी वापरल्याने वाहनचालकांची अधिकच कोंडी झाली आहे.त्यात पावसाची संततधार सुरू असताना टाकलेला मुरूम चिखल-गाळात बदलू शकतो त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना धोका निर्माण होणे साहजिक आहे.

‘डागडुजीचे’ गाजर; चार किलोमीटर रस्त्याचे निघाले धिंडवडे..!
संगमनेर अंतर्गत राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या रोषापासून वाचण्यासाठी खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असून, 2023 पासून या रस्त्याचे काम रेंगाळलेल्या स्थितीतच पाहायला मिळते.लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्यामुळे चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे धिंडवडे निघालेले आहे.वारंवार केलेल्या डागडुजीमुळे रस्ता समतोल राहिला नाही त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी सर्वसामान्य वाहन चालक,त्रस्त झाले आहे.सदर रस्त्याचे दर्जेदार मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याऐवजी नागरिकांना ‘डागडुजीचे’ गाजर दाखवले जात आहे.

तात्पुरत्या उपाययोजना करून नागरिकांची दिशाभूल..!
चितळी-राहाता रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा रोष राहाता सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारावर अधिकच तीव्र होत असून संबंधित रस्त्याच्या प्रश्नाकडे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे यांनी लक्ष घालावे अशी नागरिकांनी मागणी केली असुन राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांचा रोष कुठेतरी कमी करण्याच्या उद्देशाने तात्पुरत्या उपाययोजना करून दिशाभूल केली जात असल्याची टीका होत आहे. मात्र ही डागडुजी जास्त दिवस टिकणारी नाही रस्त्याला पक्क्या मजबुतीकरणाची गरज असुन सततच्या पावसामुळे काहीच दिवसात खड्डे पूर्ववत होतील आणि वाहनधारकांना पुन्हा त्रास सहन करावा लागेल,अशी भीती व्यक्त केली जात आहे.




