अहिल्यानगर जिल्हा

शिवरायांच्या विचारांतून कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कोल्हार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोल्हार – कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून मिळते. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श त्यांच्या कार्यातून मिळतो, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 

कोल्हार येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, सुरेंद्र खर्डे, अशोक असावा, राजेंद्र कुंकुलोळ यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून या शिवस्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच, स्मारक समितीच्या वतीने दुष्काळ सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

 

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिले स्मारक श्रीरामपूर येथे, तर दुसरे स्मारक कोल्हार येथे उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा आपल्या कृतीतून आणि त्यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श प्रशासनातून दिसला पाहिजे, हीच या उपक्रमामागील भावना आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा केंद्रबिंदू सामान्य माणूस होता. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार निर्णय घेत आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजावर शिवमुद्रेचे बोधचिन्ह समाविष्ट करून ब्रिटिश गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे ऐतिहासिक काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बारा गड-किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद झाली. सामान्य माणसाच्या हितासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते, असेही त्यांनी सांगितले.

 

शिवरायांचे स्मारक प्रत्येकाला आत्मविश्वास देते आणि त्यांच्या इतिहासातून प्रेरणा मिळते. मात्र, आज देशात काही घटकांकडून सुरू असलेल्या आंदोलनांकडे पाहता त्यांचा संविधान आणि संवैधानिक संस्थांना विरोध असल्याचे दिसून येते. त्यांची विचारधारा हिंदुत्वालाही विरोध करणारी असल्याचे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.

 

राज्यात सध्या दुष्काळाचे मोठे संकट असून, अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जलव्यवस्थापनाची आठवण होते. गड-किल्ल्यांवरील पाणवठे आणि त्यांनी निर्माण केलेले जलसाठे हे आजही मार्गदर्शक आहेत. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर कसा करावा, याचा आदर्श महाराजांच्या कार्यातून मिळतो. कोणत्याही संकटाचा सामना करण्याची प्रेरणा त्यांच्या विचारांत आहे. सध्याच्या परिस्थितीत पाण्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून, सरकारही योग्य नियोजन करीत आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, सर्व धर्म, जाती आणि पंथांतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या स्मारकाची उभारणी केली आहे. या उपक्रमातून कोल्हार ग्रामस्थांनी सामाजिक एकतेचा आणि एकजुटीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भास्करराव खर्डे यांनी केले, तर सुरेंद्र खर्डे पाटील यांनी आभार मानले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!