अहिल्यानगर जिल्हा

कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण संपन्न

पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनावरण; डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूर परिसरातील शिवप्रेमींच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.

 

स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन सुमारे दीड कोटी रुपये खर्चून हा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. नगर-मनमाड महामार्गालगत कोल्हार बसस्थानकाच्या प्रांगणात उभारण्यात आलेला हा पुतळा परिसराच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून या प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली.

 

 

अनावरण सोहळ्यानिमित्त कोल्हार-लोणी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवे ध्वज, फटाक्यांची आतषबाजी, मावळे आणि शिवकालीन सरदारांच्या वेशभूषेतील युवकांचे सादरीकरण तसेच जिवंत देखाव्यांमुळे मिरवणुकीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. मिरवणुकीदरम्यान आणि अनावरण सोहळ्याच्या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले.यावेळी प्रसिद्ध गायक अभिजीत जाधव यांचा ‘शिवशंभो गर्जना’ हा प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून शिवकालीन गीतांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा सादर करण्यात आली.

 

कोल्हार-भगवतीपूर परिसरातील प्रमुख रस्ते भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवप्रेमी युवक, ग्रामस्थ आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणामुळे कोल्हारच्या वैभवात भर पडली असून, हा सोहळा परिसरातील शिवभक्तांसाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!