अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

‘मतं वाचवा, लोकशाही वाचवा’; शिर्डीत काँग्रेसचा एल्गार

५५ हजार मतदारांची नावे वगळल्याचा मुद्दा उपस्थित; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

शिर्डी – मतदारांचे हक्क, लोकशाहीचे रक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी शिर्डी येथील प्रांताधिकारी कार्यालयाजवळ काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया रद्द करावी आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.

 

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “ज्ञानेश,तुमको जाना होगा!”, “मोदी-शहा को जाना होगा!” “राहुल गांधी, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं!” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

 

अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आणि SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुमारे ५५ हजार मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून पात्र मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी मतदारांचे अधिकार अबाधित ठेवण्यावर भर देत पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहावीत आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी, अशी मागणी केली.

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पात्र मतदारांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महागाई, वाढता शेती उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत पुरेशी नसून भरीव आर्थिक मदत आणि कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली.

 

आंदोलनानंतर प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनातील मागण्यांबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रभावती घोगरे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, सुरेश थोरात, राहाता तालुकाध्यक्ष सचिन चौगुले, राजेंद्र निर्मळ, मामा पगारे, ज्ञानेश्वर वर्पे, रमेश गागरे, सदाशिव गाडेकर, सिमोन जगताप, विक्रांत दंडवते, अमृत गायके, संदीप तारडे, मुन्नाभाई फिटर, शेख गोपीनाथ घोरपडे, संतोष वाघमारे, दीपक चौगुले, सोमनाथ जेजुरकर, कौसर पठाण, मंगेश खकाळे, राजेंद्र आग्रे, संतोष आण्णा, विकास सुराशे, अभिषेक खंडीजवळ, गायकवाड, विजय जगताप, भैय्या निरगुडे, संतोष पवार, रवींद्र इंगळे, कैलास शेजवळ, संदीप शेजवळ,चौगुले, समीना शेख आणि सुरेखा गुंजाळ यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मतदारांचे हक्क अबाधित ठेवणे, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!