(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – आजचा तरुण कुसंगतीमुळे अनेकदा व्यसनाधीनतेकडे वळत आहे. त्यामुळे तरुण वयातच त्याला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास अनेक आजारांपासून दूर राहणे शक्य होते. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन डॉ. विखे पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. श्यामकुमार भुतडा यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील,पायरेन्सच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. सुप्रिया ढोकणे पाटील, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम,पायरेन्सचे सचिव डाॅ.निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत पायरेन्सच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर लोणी यांच्यावतीने ‘जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या उपक्रमांतर्गत तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित दीक्षारंभ कार्यक्रमांतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भुतडा बोलत होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ. विजय भोर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अमोल खडके, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. स्वरांजली गाढे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. काजल खंडागळे आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी निळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. विजय भोर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानवी जीवनात निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विशद केले. आरोग्यदायी सवयी अंगीकारणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश जाधव यांनी केले.