(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर- तालुक्यातील गोंडेगाव येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कु. चंचल विकास वाणी हिने सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती, श्रीरामपूर येथे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
चंचल हिने शालेय स्तरापासूनच आपल्या वक्तृत्व कौशल्याने आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तालुकास्तरावर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत तिने अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला.चंचल हिला शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सोनवणे, वर्गशिक्षक सुजित बनकर आणि निर्मळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी घोरपडे मॅडम, विस्तार अधिकारी सुनील दरंदले, गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख शीतल गायकवाड, वाघोजी पठारे, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशालीताई सोनवणे, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गोंडेगाव ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आपल्या या यशाचे श्रेय चंचल हिने तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आणि पालकांना दिले आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.