(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी-शैक्षणिक प्रगतीसोबतच साहसी उपक्रम आणि राष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध करण्याची परंपरा जपणाऱ्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर, लोणी येथील दोन एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय स्तरावरील केरळ ट्रेकिंग व लक्षद्वीप कॅम्पसाठी निवड झाली आहे. प्रणिती उमेश पवार आणि अक्षदा अतुल परकाळे या दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय कॅम्पमध्ये सहभागी होणार आहेत. अशी माहीती प्राचार्या विद्याताई घोरपडे यांनी दिली.
या दोन्ही विद्यार्थिनी ७ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, छत्रपती संभाजीनगर या एनसीसी युनिटच्या कॅडेट्स आहेत. राष्ट्रीय स्तरावरील या कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांना साहसी उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून, निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच नेतृत्वगुण, आत्मविश्वास, शिस्त, जिद्द आणि संघभावना विकसित करण्यासाठीही हा कॅम्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि नेतृत्वगुण रुजविण्याचे काम केले जाते. अशा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रेरणादायी ठरते. प्रणिती आणि अक्षदा यांच्या निवडीमुळे विद्यालयातील इतर विद्यार्थिनींनाही एनसीसी आणि साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यांना एनसीसी विभागाच्या सेकंड ऑफिसर दीक्षा दळे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे डॉ. महेश खर्डे आदींनी अभिनंदन केले आहे.