अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

वाकडीच्या जाधव वस्ती रोडवर बिबट्याचा थरार! सकाळी साडेनऊ वाजता वाहनासमोर येऊन थांबला; प्रसंग मोबाईलमध्ये कैद

विद्यार्थी, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची वाकडी ग्रामस्थांची मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहता – तालुक्यातील वाकडी शिवारातील जाधव वस्ती रोडवर रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतीश जाधव हे दूध संकलन करून जाधव मार्गे वाकडीच्या दिशेने जात असताना अचानक बिबट्या त्यांच्या वाहनासमोर येऊन थांबला. या प्रसंगामुळे काही काळ थरार निर्माण झाला. जाधव यांनी बिबट्या वाहनासमोर आल्याचा हा प्रसंग थेट मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.

वर्षभरापासून बिबट्याचा वावर

वाकडी-जाधव वस्ती परिसरात मागील वर्षभरापासून बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिसरात बिबट्याच्या हालचाली सातत्याने दिसून येत असून, तीन ते चार दिवसांपूर्वीही बिबट्याने परिसरातील शेळ्या आणि कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता थेट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनासमोरच बिबट्या आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

जाधव वस्ती रोडवरून विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी, दूध उत्पादक आणि इतर नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. सकाळच्या वेळीही या मार्गावर नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्यावर अचानक बिबट्या आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि दूध संकलनासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना बिबट्याचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात

वाकडी शिवारात बिबट्याचा वाढता वावर, पाळीव प्राण्यांवरील हल्ले आणि आता वाहनासमोरच बिबट्या आल्याची घटना लक्षात घेता वनविभागाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक उपाययोजना करून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाकडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!