(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीविरोधात परि. पोलीस उपअधीक्षक कल्पना अंबादास पवार यांनी धडक कारवाई केली आहे. २९ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या पाच कारवायांमध्ये एकूण १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारेगावात वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला
२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० वाजता कारेगाव शिवारातील ढोकणे वस्ती परिसरात, कारेगाव ते श्रीरामपूर रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. या कारवाईत टेम्पोचालक विजय राजू मोरे (वय २५, रा. कांदा मार्केटजवळ, श्रीरामपूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच १९ सीवाय ६६३७ आणि त्यातील एक ब्रास वाळू असा दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेर्डापूरमध्ये ३५ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त
३० सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता भेर्डापूर शिवारातील प्रवरा नदीकाठी पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी विविध ठिकाणी साठवून ठेवलेला ३५ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला. या वाळूसाठ्याची किंमत दोन लाख दहा हजार रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खानापूरमध्ये गोदावरी नदीपात्रात कारवाई
१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.४५ वाजता खानापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करून विना क्रमांकाच्या सोनालिका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरली जात असताना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांगी शिवारात टेम्पोसह मोटारसायकल जप्त
१४ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजता वांगी शिवारातील प्रवरा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. या कारवाईत टेम्पो क्रमांक एमएच १७ एजी ५६६०, त्यातील एक ब्रास वाळू आणि एक मोटारसायकल असा दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भामाठाणमध्ये पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
१६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ वाजता भामाठाण शिवारात गणेश बनसोडे यांच्या वस्तीशेजारी, भामाठाण ते मुठेवाडगाव रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. या कारवाईत टेम्पोचालक प्रमोद जालिंदर चांदणे (वय २१, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच २३ एयू २९३१ आणि त्यातील एक ब्रास वाळू असा पाच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू तस्करांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा
श्रीरामपूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाळू तस्करांविरुद्ध हद्दपारी तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक कल्पना अंबादास पवार, पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले, सहायक फौजदार अर्जुन बाबर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात, अमोल जाधव आणि होमगार्ड हरीश चव्हाण यांनी ही कारवाई केली.