अहिल्यानगर जिल्हानेवासा तालुकाबिबट्याचा हल्ला

नेवासा हादरले! गोधेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू

आ. विठ्ठलराव लंघे यांची घटनास्थळी भेट; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

नेवासा – नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील मारुती चौक, औटी वस्ती परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेती कामगार सुरेश दादासाहेब अहिरे (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घराशेजारील शेडमध्ये झोपलेल्या अहिरे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना जवळच्या शेतात ओढून नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गोधेगाव परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोधेगाव येथील काशिनाथ औटे यांच्या घराशेजारी असलेल्या शेडमध्ये सुरेश अहिरे झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दिसून न आल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी जवळच्या कापसाच्या शेतात त्यांची चप्पल आढळून आली. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याचा संशय बळावला. ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन शोध घेत असताना शेजारील उसाच्या शेतात सुरेश अहिरे यांच्या शरीराचा भाग आढळून आल्याचे वृत्त आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठलराव लंघे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली. तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी वनविभागाचे अधिकारी अविनाश तेलोरे, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, महसूल मंडळ अधिकारी गव्हाणे, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

गोधेगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि शेतवस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने परिसरात बिबट्याचा शोध घेऊन नागरिकांच्या संरक्षणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.या दुर्दैवी घटनेबद्दल आमदार विठ्ठलराव लंघे यांनी अहिरे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. तसेच सुरेश अहिरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!