अहिल्यानगर जिल्हासंगमनेर तालुका

पंचनाम्यांत वेळ घालवू नका, दुष्काळग्रस्तांना सरसकट मदत करा;माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील १२ गावांत दुष्काळी परिस्थितीची पाहणी; पिकांचे नुकसान, चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर, शेतमजुरांचे थकीत वेतन आणि निराधार योजनेचे पैसे तातडीने देण्याची मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पठार भागात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी आणि शेतमजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पठार भागातील १२ गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शासनाने पंचनाम्यांत वेळ न घालवता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, भुईमूग आणि बाजरी ही पिके पावसाअभावी करपून गेली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून द्यावी, असे थोरात यांनी सांगितले.

दुष्काळाचा परिणाम शेतीबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. शेतात कामे नसल्याने शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हे प्रश्नही ऐरणीवर आले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच पशुधनासाठी चारा आणि नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामीण भागातील अकुशल कामगारांचे मागील सहा महिन्यांपासूनचे वेतन थकीत असल्याचा मुद्दाही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याचे सांगत, शासनाने थकीत रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी त्यांनी केली. आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन गरजा भागविताना अडचणी येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हिवरगाव पठार, जांभुळवाडी, मांडवे, बिरेवाडी, कवठे मलकापूर, सुळकेवाडी, चौधरवाडी, कणसेवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी, रणखांब आणि पिंपळगाव देपा या गावांमध्ये त्यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी, महिला आणि युवकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने पंचनाम्यांची वाट न पाहता तातडीने सरसकट मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!