अहिल्यानगर जिल्हाश्रीरामपूर तालुका

हरेगाव मळ्यातील आकारी पडीत व खंडकरी शेतकऱ्यांना हक्काच्या जमिनी द्या; आ. हेमंत ओगले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांच्या प्रलंबित दाव्यांची छाननी करून जमिनींचे वाटप करण्याची मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – तालुक्यातील हरेगाव मळा येथील आकारी पडीत व खंडकरी शेतकरी तसेच त्यांच्या कायदेशीर वारसदारांना त्यांच्या हक्काच्या जमिनी तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आ. हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून जमिनींच्या वाटपाची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील हरेगाव मळा येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन आकारी पडीत शेतकरी तसेच खंडकरी शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांना मिळावी, यासाठी आपण यापूर्वीही शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच विविध अधिवेशनांच्या माध्यमातून या प्रश्नाचा पाठपुरावा केला असल्याचे आ. हेमंत ओगले यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, दारूगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य निर्मिती तसेच जैव-सीएनजी प्रकल्प उभारणीसाठी संबंधित जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, नुकतेच या प्रकल्पांचे भूमिपूजन झाल्याचे समजले आहे. राज्याच्या औद्योगिक विकासाच्या आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे असून, त्यांना आपला कोणताही विरोध नसल्याचे आ. हेमंत ओगले यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, हरेगाव मळा येथील जमिनीवर प्रथम हक्क असलेल्या आकारी पडीत व खंडकरी शेतकरी तसेच त्यांच्या कायदेशीर वारसदारांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. संबंधित शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनी मिळवण्यासाठी सातत्याने संघर्ष करत असून, शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शासनाने प्रकल्पांसाठी ज्या तत्परतेने जमीन उपलब्ध करून दिली, त्याच तत्परतेने आकारी पडीत व खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रलंबित दाव्यांची छाननी करावी. संबंधित शेतकऱ्यांचे जमिनीवरील हक्क निश्चित करून त्यांच्या हक्काच्या जमिनींचे वाटप करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, ही आपली प्रमुख मागणी असल्याचे आ. हेमंत ओगले यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा, ता. श्रीरामपूर येथील आकारी पडीत व खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी तातडीने मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी आ. हेमंत ओगले यांनी केली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!