(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त सहा पदांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राहाता तहसील कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
वाकडी, पुणतांबा, सावळीविहीर बुद्रुक, कोऱ्हाळे, कोल्हार आणि निमगाव कोऱ्हाळे या गावांतील रिक्त पदांचा यामध्ये समावेश आहे. याबाबत तहसीलदार तथा महसूल सेवक भरती समितीचे सदस्य सचिव अमोल मोरे यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्या ६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राहाता तालुक्यातील सहा रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
कोतवाल संवर्गातील पदांची बिंदुनामावली तपासणी करून आरक्षण निश्चित करण्यासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागासवर्ग कक्षाकडून ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार संबंधित पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
उपविभागीय अधिकारी, शिर्डी विभाग तथा कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा होणार आहे. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राहाता तहसील कार्यालयात आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पार पडणार आहे.या प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक नागरिकांनी निर्धारित दिवशी व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार तथा महसूल सेवक भरती समितीचे सदस्य सचिव अमोल मोरे यांनी केले आहे.