(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –ग्रामीण भागातील युवक-युवती, शेतकरी आणि बेरोजगारांना शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवी विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेळीपालन व्यवसायाचे शास्त्रीय तंत्रज्ञान, सुधारित जातींची निवड, चारा व गोठा व्यवस्थापन, पशुरोग प्रतिबंधक उपाययोजना तसेच शासकीय अनुदान आणि बँक कर्ज याविषयी तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम आणि पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाला ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. कमी जागेत आणि उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. मात्र, व्यवसायात यश मिळविण्यासाठी शेळ्यांच्या योग्य जातींची निवड, संतुलित आहार, चाऱ्याचे नियोजन, स्वच्छ गोठा, आरोग्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक असतो. या बाबींचे शास्त्रीय ज्ञान मिळावे आणि प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य दिशा मिळावी, यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणादरम्यान शेळ्यांच्या सुधारित जातींची निवड व त्यांची वैशिष्ट्ये, शेळ्यांसाठी पोषक चारा उत्पादन, चारा व्यवस्थापन, गोठ्याची उभारणी व स्वच्छता, शेळ्यांचे संगोपन, प्रजनन व्यवस्थापन आणि लहान पिल्लांची काळजी या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शेळ्यांमध्ये आढळणारे विविध आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर लसीकरण आणि पशुवैद्यकीय उपचारांचे महत्त्व याविषयीही माहिती दिली जाणार आहे.
शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक नियोजन, भांडवलाची उपलब्धता, व्यवसायाचा खर्च व उत्पन्न यांचा अंदाज, शासकीय अनुदानाच्या योजना आणि बँक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे स्वतःचा शेळीपालन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना व्यवसायाचे नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे.
या प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण युवकांनी पारंपरिक शेतीसोबत जोडव्यवसाय विकसित करावा, स्वतःच्या उत्पन्नाचे साधन निर्माण करावे आणि आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागी उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.
शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवती, शेतकरी आणि स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. प्रवेशासाठी आधार कार्डसह नावनोंदणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ व प्रमुख शास्त्रज्ञ श्री. शैलेश देशमुख यांनी केले आहे.