(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्याची व गणेश परिसराची कामधेनू असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखाना लिमिटेड, गणेशनगरच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात येणार असून, आमदार विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
श्री उपासनी कन्याकुमारी स्थान, साकुरी येथील ऋ. माधवीताई गुरुगोदावरी व कन्यावृंद यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडणार आहेत. कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी ही माहिती दिली.यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन विजय दंडवते व कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे उपस्थित राहणार आहेत. तसेच कारखान्याचे संचालक संपतराव कचरू हिंगे व सौ. वंदनाताई हिंगे या दाम्पत्याच्या हस्ते बॉयलरचे विधिवत पूजन होणार आहे. त्यानंतर गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
अडचणींच्या काळातही कारखाना सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न
राहाता तालुक्याची व गणेश परिसराची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या या कारखान्याची वाटचाल सुरू राहणे हे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांसाठी महत्त्वाचे आहे. अडचणीच्या काळातही कारखाना सुरू राहावा, यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार विवेक कोल्हे यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने गणेशची वाटचाल सुरू असल्याचे कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी सांगितले.गणेश परिसरातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांच्या सहकार्यामुळे कारखान्याला बळ मिळत आहे. आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
संत-महंतांच्या आशीर्वादाने सुरू होणाऱ्या गळीत हंगामाच्या शुभारंभ सोहळ्यास सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हाइस चेअरमन विजय दंडवते, कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.