(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – वडिलांचे १५ हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला. मात्र, मदतीसाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसालाच मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व एमडीटी मशिन हिसकावून घेतल्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील निमगावखैरी येथे घडला. या प्रकरणी तक्रारदारासह दोघांविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भागवत गर्जे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, गर्जे हे डायल ११२ या आपत्कालीन सेवेच्या कर्तव्यावर असताना निमगावखैरी येथील अविनाश दगडू फुलकर यांचा त्यांना फोन आला. वडिलांचे १५ हजार रुपये १० ते १५ मिनिटांपूर्वी चोरीला गेल्याचे फुलकर यांनी सांगितले. त्यानंतर गर्जे तातडीने घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर गर्जे यांनी फुलकर यांच्याकडे घटनेची माहिती घेतली. त्यावेळी पैसे घेणारी व्यक्ती शेजारी राहत असल्याचे सांगून फुलकर यांनी संबंधिताचे घर दाखविण्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी कर्तव्याचा भाग म्हणून एमडीटी मशिनमध्ये एटीआर भरणे आणि घटनास्थळी भेट दिल्याचे छायाचित्र अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केली.
यावरून फुलकर यांनी पोलिसांना जाब विचारत वाद घातला. ‘मला एवढी मारहाण करून माझा पाय मोडला, पैसे काढून घेतले, मला मदत करायची सोडून तुम्ही फोटो काय काढता?’ असे म्हणत त्यांनी गर्जे यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर फुलकर यांनी गर्जे यांचा हात धरून ओढले. तसेच, ‘दोरी आणा, याचे हातपाय बांधून घरात टाकू,’ असे म्हणत त्यांना धमकावले. यावेळी मंगल फुलकर व अन्य दोघांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारादरम्यान आरोपींनी गर्जे यांच्या हातातील मोबाईल आणि एमडीटी मशिन हिसकावून घेतले. तसेच, ‘असे पोलीस लई बघितले, आम्ही पण पक्के आहोत, तुला दाखवतोच काय चीज आहे,’ असे म्हणत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील सहकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर गर्जे यांची सुटका झाली.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भागवत गर्जे यांच्या फिर्यादीवरून अविनाश दगडू फुलकर आणि मंगल अविनाश फुलकर यांच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमस्कार,
दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏
Back to top button
error: Content is protected !!