अहिल्यानगर जिल्हा

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलचे यश १४ व १७ वर्षे मुलांच्या संघासह मुलींची ही बाजी जिल्ह्यात विजेतेपद

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलच्या १४ व १७ वर्षे मुले या दोन्ही वयोगटातील संघांनी शानदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. दोन्ही गटांमध्ये अंतिम सामन्यात दमदार विजय मिळवत शाळेने फुटबॉल क्षेत्रातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. अशी माहिती प्राचार्य डॉ.बी.बी. अंबाडे यांनी दिली.

 

 प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा संचालक श्री. रमेश दळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शाळांमधील एकूण १२ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, अचूक पासिंग, आक्रमक चाली, भक्कम बचाव आणि उत्कृष्ट गोलरक्षणाच्या जोरावर अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला.

 

१७ वर्षे मुले वयोगटाच्या अंतिम सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने गौतम पब्लिक स्कूलचा २-० गोलने पराभव करत जिल्ह्याचे विजेतेपद पटकावले. संपूर्ण सामन्यात प्रवरा संघाने आक्रमण व बचाव यांचा सुरेख समन्वय साधत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व राखले.

१४ वर्षे मुले वयोगटाच्या अंतिम सामन्यातही प्रवरा पब्लिक स्कूलच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत गौतम पब्लिक स्कूलचा ३-० गोलने पराभव केला. उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रवरा संघाने एकतर्फी विजय मिळवून जिल्हास्तरीय विजेतेपद आपल्या नावावर केले.या यशासाठी शाळेचे क्रीडा संचालक श्री. अफजल पटेल, क्रीडा शिक्षक दीपक जाधव, फुटबॉल प्रशिक्षक अतुल डे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रतिशोपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका डॉ. लीलावती सरोदे आदींनी संघाचे अभिनंदन केले आहे. 

  

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!