(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील कोल्हार येथील बेलापूर चौकात महिलेच्या गळ्यातील डोरले हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एका संशयिताला ग्रामस्थांनी पकडले. दुसरा संशयित गर्दीचा फायदा घेत पसार झाला. पकडलेल्या संशयिताला लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बेलापूर चौक परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास भाजीपाला व्यावसायिक शोभा प्रविण देशमाने या आपल्या सासूसोबत घरी जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील डोरले हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनी मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शोभा देशमाने आणि त्यांच्या सासूने आरडाओरडा केला. आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावून आले. त्यांनी पाठलाग करून एका संशयिताला पकडले; मात्र दुसरा संशयित पसार होण्यात यशस्वी झाला.
संशयिताला पकडल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. काही ग्रामस्थांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संकेत संजय खर्डे यांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संशयिताला लोणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चेन स्नॅचिंगचा प्रयत्न उधळला गेला. पसार झालेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत.