अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, रामपूरवाडीतील गावठाण फिडरचे रखडलेले काम पुन्हा सुरू

दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना,ग्रामस्थांकडून आ. विवेकभैय्या कोल्हे यांचे आभार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील रामपूरवाडी गावासाठी मंजूर असलेल्या ११ केव्ही गावठाण फिडरच्या लिंक लाईनचे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले काम अखेर पुन्हा सुरू झाले आहे. गावातील वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी रामपूरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने २९ जून २०२६ रोजी पत्रव्यवहार करून स्वतंत्र गावठाण फिडरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आ. कोल्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून रखडलेले काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

 

रामपूरवाडी गावासाठी अंदाजे सहा किलोमीटर लांबीची ११ केव्ही गावठाण फिडर लिंक लाईन मंजूर करण्यात आली आहे. या कामाला २०२४ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, विविध अडचणींमुळे गेल्या दोन वर्षांपासून काम रखडले होते. सध्या गावासाठी जुनी ११ केव्ही कृषी वीजवाहिनी कार्यरत असून, लोडशेडिंग आणि ओव्हरलोडमुळे या वाहिनीवर वारंवार फॉल्ट होत असल्याने ग्रामस्थांना वीजपुरवठ्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

स्वतंत्र गावठाण फिडरचे काम पूर्ण झाल्यानंतर रामपूरवाडीतील सुमारे ५०० घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे. स्वतंत्र फिडरमुळे कृषी वीजवाहिनीवरील भार कमी होऊन गावातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

 

फिडरचे काम सुरू असताना रेल्वे क्रॉसिंग तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण झाल्याने मागील दोन दिवसांपासून काम बंद होते. ही बाब आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता, संगमनेर तसेच एनसीसीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाठवून अडचणी दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दिवाळीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत गावठाण फिडरचे काम पूर्ण झाले पाहिजे आणि दिवाळीपर्यंत रामपूरवाडीतील नागरिकांना स्वतंत्र गावठाण वीजपुरवठा मिळाला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना आ. कोल्हे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच रेल्वे क्रॉसिंगच्या अडचणीबाबत पुणतांबा येथील रेल्वे अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनीही सहकार्याची भूमिका घेतल्याने बंद असलेले काम पुन्हा सुरू झाले.

 

गावठाण फिडरचे काम पुन्हा सुरू झाल्याने रामपूरवाडी ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रखडलेले काम तातडीने सुरू करून दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याबद्दल सतीश आप्पा जगताप, मच्छिंद्र शिंदे, मच्छिंद्र गोरे, मनोज साळुंखे, विलास आंबडकर, सुभाष सांबारे, आसाराम आग्रे, शिवनाथ गायके, दत्तात्रय सांबारे, अमोल लोंढे, शिवा थोरात, रवींद्र नळे, अजय धनवटे, सतीश गिरे, अविनाश लोंढे, अभिराज शिंदे, विनायक आग्रे, बाळासाहेब धनवटे आदींनी आ. विवेकभैय्या कोल्हे यांचे आभार व्यक्त केले.

या कामासाठी कार्याध्यक्ष बबनराव काळे, उपसरपंच मंदाताई काळे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन चंद्रभान भोरकडे पाटील, लहानु वडणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाशजी शेळके, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक प्रसादजी काळे, विनायक धनवटे आदींनीही पाठपुरावा व सहकार्य केले. संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून फिडरच्या कामाला पुन्हा गती मिळाली असून, दिवाळीपूर्वी काम पूर्ण होऊन गावाला स्वतंत्र वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!