(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर- तालुक्यातील उक्कलगाव येथील लम्हाणबाबा शिवार आणि धनवाट रस्त्यावरील शेतवस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. सोमवारी सायंकाळी दाट उसाच्या फडातून बाहेर आलेल्या बिबट्याने थेट शेतमजुरांच्या दिशेने झेप घेतल्याची थरारक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
थोरात-मोरे वस्ती परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काही शेतमजूर महिला शेतात घास खुरपणीचे काम करत होत्या. त्याचवेळी जवळच्या दाट उसातून अचानक बिबट्या बाहेर आला आणि मजुरांच्या दिशेने झेपावला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मजुरांची धावपळ उडाली. मजुरांनी आरडाओरड करत सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
उक्कलगाव आणि परिसरातील नदीकाठच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती आहे. दाट ऊसामुळे बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत आहे. या भागात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत. संध्याकाळनंतर शेतात जाणेही धोकादायक बनले आहे.
बिबट्यामुळे शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. संबंधित भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी प्रकाश थोरात, गणेश मोरे, बाबासाहेब शेरमाळे, संजय चिंधे, पुरुषोत्तम थोरात, ज्ञानेश्वर चिंधे, साईनाथ थोरात, ओम थोरात, कार्तिक चिंधे आणि कृष्णा शेरमाळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, शेतवस्त्यांवरील वीजपुरवठा खंडित राहत असल्याने अंधारात बिबट्याचा धोका अधिक वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धनवाट रस्त्यावरील शेतवस्तीवर सायंकाळच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.